महिलांचे जलव्यवस्थापनासाठी नेतृत्व आवश्यक : प्रशांत संत

Foto
नेवरगावात जलसाक्षरतेचा नवा अध्याय;
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

गंगापूर, (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ५, संभाजीनगर यांच्या पुढाकाराने गंगापूर तालुक्यातील मौजे नेवरगाव येथे महिला सशक्तीकरण व जलव्यवस्थापन विषयक समन्वय सभा उत्साहात सोमवार २० एप्रिल रोजी पार पडली. 

ग्रामीण भागात जलसाक्षरता वाढविण्यासोबतच महिलांना जलव्यवस्थापन प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण येथील कार्यकारी अभियंता प्रशांत संत हे होते, तर उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रशांत संत यांनी जलसंधारण, पाण्याचा सुयोग्य वापर आणि शाश्वत जलव्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असून त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन हेच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांची भूमिका अधोरेखित करत घरगुती तसेच शेती
पातळीवर पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमास उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे, शाखा अभियंता तुषार विसपुते, मंगेश शेलार, नेहा धुळे तसेच गावातील मान्यवर दत्तात्रय पवार, बाबुराव नरवडे, श्रीहरी आघाडे, रामेश्वर वालतुरे, मच्छिंद्र आघाडे, सीमा दिलीप वालतुरे, कल्पना गायकवाड, विमलताई शिरसाट, कल्पना दुशिंग यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी नेहा धुळे, चंद्रकांत हिवाळे, ज्ञानेश्वर भागवत, दीप्ती व्यवहारे, सारिका बेडवाल, अर्चना मारकड, वेदिका मुढे, अर्चना साखरे, अर्चना राठोड व अंकिता बोंबार्डे यांनी जलव्यवस्थापनाबाबत आपले विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनातून जलसंवर्धनाचे उपस्थितांना व्यावहारिक पैलू समजून घेता आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सारिका निंबाळकर यांनी सादर केलेले प्रभावी एकपात्री नाट्य. या सादरीकरणातून जलसंवर्धनाचा संदेश अत्यंत प्रभावीपणे पोहोचवला. उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सूत्रसंचलन चंद्रकांत हिवाळे, प्रास्ताविक लता बोरमाळे यांनी तर आभार भारती साबळे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप्पासाहेब ढोले, मेजर पवार, साहेबराव दुशिंग, श्याम मोरे तसेच गंगापूर, पैठण व वैजापूर येथील जायकवाडी शाखेतील जलफुगवटा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-- अशा उपक्रमांची आवश्यकता --
ग्रामीण भागात जलव्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करत महिलांना सशक्त करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.